शिवशक्ती महिला गटात प्रथम
। पाचगणी । वृत्तसंस्था ।
भारत पेट्रोलियम आणि शिवशक्ती यांनी पाचगणी व्यायाम मंडळ आयोजित अनुक्रमे पुरुष व्यावसायिक आणि महिला गटात अजिंक्यपद पटकाविले. भारत पेट्रोलीयमचा अजिंक्य पवार पुरुषांत सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख 11 हजार रूपये देऊन गौरविण्यात आले. शिवशक्तीची रेखा सावंत महिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिला रोख 5 हजार रूपये देऊन सन्मानित करण्यात आले. पाचगणी येथील बाळासाहेब भिलारे क्रीडानगरीत झालेल्या व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियमने मुंबई बंदरचा दुबळा प्रतिकार 34-09 असा संपवित भाऊसाहेब भिलारे चषक आणि रोख एक लाख अकरा हजार एकशे दहा रूपये आपल्या नावे केले. उपविजेत्या मुंबई बंदरला चषक व रोख पासष्ट हजार रूपयांवर समाधान मानावे लागले. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्तीने उपनगरच्या स्वराज्य मंडळाला 30-17 असे रोखत भाऊसाहेब भिलारे चषक व रोख 51 हजार रूपये आपल्या नावे केले. उपविजेत्या स्वराज्य मंडळाला 30 हजार रूपयांवर समाधान मानावे लागले.