| उरण | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पदभार स्वीकारताच उरण नगरपालिकेतील प्रलंबित प्रश्नांवर थेट कारवाईचा पवित्रा घेतला आहे. कार्यालयीन कागदपत्रांपुरते मर्यादित न राहता त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करत संबंधित अधिकारी वर्गाला जबाबदार धरत कामाच्या मार्गावर लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी बुधवारी (दि.31) श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाला अचानक भेट दिली. या क्रीडा संकुलाची अवस्था अत्यंत धोकादायक व जीर्ण असल्याचे दिसून आले. याबाबत अधिकारी वर्गाकडे विचारणा करताच समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?असा सवाल करत त्यांनी प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली. या क्रीडा संकुलाचा ठेका कधी, कोणाला व कोणत्या कायदेशीर प्रक्रियेतून देण्यात आला, याची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश नगराध्यक्षा घाणेकर यांनी दिले आहेत. ठेका कायदेशीर नसेल तर त्याबाबत कठोर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पदभार स्वीकारताच नगराध्यक्षा घाणेकर यांनी मोरा प्रभागात साचलेल्या कचऱ्याच्या समस्येवर तातडीची कारवाई केली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली व त्यानंतर प्रत्यक्ष मोरा येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. साचलेला कचरा, पसरलेली दुर्गंधी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले पाहून त्यांनी आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांना तात्काळ कचरा उचलण्याचे आदेश दिले. या बैठकीनस माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेवक अतुल ठाकूर, विक्रांत म्हात्रे, नगरसेविका नाहिदा ठाकूर, प्रार्थना म्हात्रे, प्रमिला पवार, वंदना पवार तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते.
भावना घाणेकर यांचा कामांचा धडाका
