गौरव नारी शक्तींचा देखावा ठरला आकर्षणाचे केंद्रबिंदू
| मुंबई | प्रतिनिधी |
भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या भवानी नडगाव येथील भवानी देवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या यात्रेचे हे 49 वे वर्ष होते. जत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी करत भवानी देवी चरणी माथा टेकवला. या जत्रोत्सवात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
मंदिरांच्या गाभाऱ्यात व परिसरात ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या सहकार्याने आणि तरुण मित्र मंडळाच्या संकल्पनेतून नारी शक्तींचा अर्थात स्त्री शक्तींचा गौरव करणारा देखावा साकारण्यात आला होता. हा देखावा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. या देखाव्याच्या माध्यमातून भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्री बाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, रणरागिणी झाशीची राणी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अनाथांची माय माऊली सिंधुताई सपकाळ, सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, किरण बेदी, कल्पना चावला अशा विविध क्षेत्रांत देशासाठी महान कामगिरी करणाऱ्या नारी शक्तींचा कार्याची महती सादर करण्यात आली. या प्रतिमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न गावातील तरुण प्रणय अगबुल व सहकारी तरुण वर्ग, ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून देश प्रगतीसाठी हातभार लावण्यास पुढे येऊया, असा मौलिक संदेशही याप्रसंगी देण्यात आला.







