| नेरळ । वार्ताहर ।
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उद्यापासून सुरू होणार्या श्रावण महिन्यात भीमाशंकर महाराज यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी केली असते. श्रावणी सोमवारी तर लाखोंच्या संख्यने शिवभक्त भीमाशंकर येथे पोहचतात आणि दर्शन घेत असतात. भीमाशंकर ला जाण्यासाठी अभयारण्य जंगलातून पायवाट कर्जत तालुक्यातून जाते. यामुळे हौशी ट्रेकर्स प्रचंड संख्यने दिवस रात्र भीमाशंकरची वाट तुडवीत असतात. कोरोनामुळे भीमाशंकर महाराज यांचे मंदिर बंद असल्याने भक्तांचा हिरमोड होत असला तरी देखील ट्रेकिंगसाठी विकेंडला हजारो ट्रेकर्स भीमाशंकर अभयारण्य मधून जंगलाची वाट शोधत असतात.
भीमाशंकरला खांडस मार्गे जाणार्या भाविकांची रीघ लागली आहे. बारां ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे असून तेथे पुणे जिल्ह्यातून वाहने घेऊन पोहचता येते. तर भीमाशंकर या अभयारण्यातून निसर्गाचा आनंद घेत आणि औषधी वनस्पती यांचा अभ्यास करीत शेकडो ट्रेकर्स आणि पर्यटक कर्जत तालुक्यातील दोन पायवाटांनी भीमाशंकर येथे पोहचत असतात. भीमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खांडस आणि काठेवाडी येथून दोन वाटा भीमाशंकर अभयारण्यात घेऊन जातात. खांडस गावी पोहचण्यासाठी कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकातून प्रवासी वाहने आहेत. नेरळ स्टेशन आणि तेथुन कशेळे येथे आल्यानंतर कशेळे येथून खांडसला जाणार्या मिनिडोअर उभ्या असतात. कशेळे ते खांडस हा 14 किमीचा हिरव्यागार झाडातून जाणारा रस्ता घाट चढण्यासाठी नवी ऊर्जा देत असतो.
थोडासा अवघड असणार्या शिडी घाट मार्गे पावणे दोन तासात भीमाशंकरला पोहचता येते. अनेक वर्षांपासून असलेली लाकड़ी शिडी बदलून त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावल्याने धोकादायक मार्ग सोपा झाला आहे. दूसरा रास्ता कलावंतीच्या माळावरुन गणपती घाट मार्गे, भीमाशंकर अभयारण्यातुन जातो या मार्गाने अडीच तासात भीमाशंकरला पोहचता येते. संपूर्ण प्रवासात डोंगरावरुन दिसणारी खांडस नांदगांव परिसरातील छोटी छोटी गावे, हिरवीगार शिवारे, डोंगरावरुन उसळणारे लहान लहान धबधबे असे विलक्षण मनमोहक दृश्य आणि मधुनच होणारे शेकरुचे दर्शन यातून प्रवास कधी संपतो तेच कळत नाही.पावसाळ्यात अत्यंत आनंददायी असा हा अनुभव सर्वांना घेता येतो.