तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन सर्तक
| पेण | प्रतिनिधी |
गेली आठ दिवस संतप्तधार पाऊस कोसळत आहे. दैनंदिन पावसाची आकडेवारी पाहिली तर माथेराननंतर सर्वात जास्त पाऊस हा पेण तालुक्यात पडत असून गेल्या 10 वर्षाचा उच्चांक पावसाने गाठला आहे. गेल्या आठवडयात पेण तालुक्यातील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला होता. तीच स्थिती आज पुन्हा झाली आहे. पूर्ण हमरापूर विभाग जलमय झाला असून कित्येक गणपती कारखाने पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी नागरिक सज्ज्ा असून त्यांना प्रशासनाची चांगली साथ मिळत आहे.
रात्रीच्या वेळी अंतोरा बंदरातील नागरिकांना तहसिलदारांनी स्वतः जाऊन सुरक्षित जागी हलवले आहे. भोगावती नदी पेण शहर सोडल्यानंतर अंतोरा गावच्या हद्दित प्रवेश करते, आणि त्यानंतर धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पाणी अंतोरा गावात शिरते. त्यामुळे अंतोरा बंदरातील नागरिकांना त्याचा मोठा धोका उद्भवतो.
1989 नंतर 2005 आणि आता अंतोरा बंदरात धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच येथील नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. तसेच बाळगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी खरोशी गावामध्ये आणि दुरशेत गावामध्ये शिरले आहे. ही दोन्ही गावं बाळगंगेच्या तिरावर अल्याड-पल्याड आहेत. त्यामुळे बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाणी गावात शिरले आहे.
या दोन्ही गावांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाशी संपर्क तुटला असून येथील नागरिकांना देखील सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पातळगंगा दुथडी भरून वाहत असून दुष्मि ग्रामपंचायतच्या हद्दितील ठाकूर पाडा भागात पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. तीच स्थिती वाशी विभागात आहे. मात्र वाशी विभागामध्ये कणा गाव वगळता इतर कोणत्याच गावामध्ये धोकादायक स्थिती निर्माण झाली नव्हती. परंतु वाशी विभागातील नागरिकांना देखील सर्तकतेचा इशारा दिला आहे.
तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी कृषीलवशी बोलताना सांगितले की, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका. तालुक्यात पुरपरिस्थिती असली तरी आपत्ती व्यवस्थापन, मी स्वत: आणि संपूर्ण टिम सर्व बांबीकडे लक्ष ठेवून आहे. कोठेही काहीही परिस्थिती गंभीर होत असेल असे वाटल्यास त्वरीत माझ्याशी किंवा आपत्ती व्यवस्थापन नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी. जेणे करून त्वरीत त्या गावात अथवा त्या विभागात मदत पोहोचवता येईल, असे सांगितले.
पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील हे देखील स्वत: पेण शहरात प्रत्येक विभागत लक्ष ठेवून असून नगरपालिकेकडून दवंडी देखील फिरवण्यात आली आहे. त्यांनी देखील कृषीवलशी बोलताना सांगितले की, उत्कर्ष नगर वगळता पेणमध्ये कोठेही पाणी घरांमध्ये गेले नाही. म्हाडा, शंकर नगर, विष्णू नगर, चिंचपाडा, या भागातून सांडपाण्याची व्यवस्था योग्य होत असल्याने कोठेही पुरसदृश्य परिस्थिती नाही.