सिडकोकडून पाईपलाईनसाठी नदीत खोदाई; महसूल, जलसंपदा विभाग मात्र अनभिज्ञ
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहराची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणार्या भोगावती नदीला गेल्या तीन ते चार वर्षांत अतिक्रमणाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे महसूल खाते, जलसंपदा खाते उघड्या डोळ्याने पाहात आहेत. दिवसेंदिवस नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यातच सिडकोने आपली पाईपलाईन विश्वेश्वर धरणापासून पुढे नदीतून टाकण्यास सुरुवात केलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याबाबत महसूल अथवा जलसंपदा खात्याला काहीही माहिती नसल्याचे समोर येत आहे.
11 डिसेंबर रोजी पेण प्रसार माध्यामांच्या प्रतिनिधींनी सकाळी 11 वाजता भोगावती नदी गाठली. तेव्हा समोर आलेले चित्र खूपच विदारक होते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दगड फोडून उत्खनन केले होते. तर, काही भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भरावदेखील केलेला दिसत होता. त्याप्रमाणे पाईप कट करण्यासाठी गॅस कटरला वापरण्यात येत असणारा गॅस हा घरगुती वापराचा होता. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार तानाजी शेजाळ यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नदीत चाललेल्या अतिक्रमणाबाबत कल्पना दिली. त्यांना नदीत असा काही प्रकार चाललेला आहे हे माहीत नव्हते, तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी पेण मंडळ अधिकारी सुजाता जाधव, पेण तालाठी अनिकेत पाटील, महसूल सेवक सचिन घरत, महसूल सेवक किरण पवार यांना पाठवले. त्यांनी तातडीने सर्व बाबींचे पंचनामे केले. परंतु, खरी गमंत तर पुढेच होती. सिडको पाईपलाईनचे काम स्काय वे कंपनी करीत आहे. हे तेथे असलेले सुपरवायझर अशोक मंडळ यांना तलाठ्याने दटावून विचारल्यावर सांगितले व आमच्याकडे कंपनीकडून कोणतीच परवानगीची कागदे दिलेली नाहीत. नदीतून पाईपलाईन टाकण्यास फक्त तोंडी सांगितले आहे. त्यामुळे आमच्याकडे आत्ता तरी परवानगीची कोणतीच कागदे नाहीत, असे सांगितले. त्यानंतर प्रसार माध्यामांच्या प्रतिनीधींनी सखोल माहिती घेतल्यानंतर असे समजले की, सिडकोकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी अगोदरच जागा संपादन केलेली आहे. परंतु, त्या जागांवर अतिक्रमण झाल्याने अतिक्रमण खाली न करता सिडको बिनधास्तपणे नदीत अतिक्रमण करुन पाईपलाईन टाकत आहे. याचाच अर्थ, सिडको अतिक्रमण करणार्यांना अभय देत आहे असेच आहे. नदीपासून जो जुना रस्ता आहे, त्याला सिडकोने अगोदर मार्किंग केलेली आणि त्या रस्त्यातून ती लाईन जाऊन वरती काँक्रिट करुन व्यवस्थित रस्ता करुन देणार होते. परंतु, हे कोणाच्या सांगण्यावरून की कोणाला वाचवण्यासाठी किंवा अतिक्रमण वाचवण्यासाठी किंवा सिडको स्वतःची हक्काची जागा सोडून नदीतून पाईपलाईन टाकते आणि नदी अक्षरशः उद्ध्वस्त करत आहे. तर हे चुकीचे आहे. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे.
नदीतून पाईपलाईन टाकण्याबाबत ठेकेदाराकडे कोणतीही ठोस कागदपत्रे नाहीत. फक्त तोंडी आदेश दिल्याचे त्यांच्याकडून समजते, त्यामुळे निसर्गप्रेमी काम त्वरित थांबवले नाही तर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील.