गोविंदा पथक दिलीप भोईर यांच्यावर नाराज; सोशल मिडियावर व्यक्त केला निषेध
| अलिबाग | प्रतिनिधी |
शिंदे गट शिवसेना पुरस्कृत दहीहंडी स्पर्धा रेवदंडा येथे घेण्यात आल्या होत्या. भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेत कमी वेळेत दहीहंडी फोडण्याचा नियम असताना चिठ्ठी पध्दतीने ही स्पर्धा घेऊन मेटपाडा येथील मरीआई गोविंदा पथकाला डावलण्यात आले. पारंपारिक खेळ असलेल्या दहीहंडी स्पर्धेत दिलीप भोईर यांनी राजकारण केल्याने त्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मिडीयासह वेगवेगळ्या पध्दतीने दिलीप भोईर यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
मेटपाडा मरीआई गोविंदा पथक हे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या दहीहंडी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन कमी वेळेत थर उभारणारे पथक म्हणून ओळखले जाते. रायगडसह वेगवेगळ्या जिल्हयात या पथकाचा स्पर्धेमध्ये सहभाग असतो. मुंबईत झालेल्या प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धेत सहभाग घेणारे गोविंदा पथक म्हणून मेटपाडा मरीआई गोविंदा पथकाची ओळख आहे.
रेवदंडामध्ये गुरुवारी भैरवनाथ मित्रमंडळाच्यावतीने दहीहंडी स्पर्धा आयोजित केली होती. शिंदे गट शिवसेना पुरस्कृत ही स्पर्धा होती. पाच थरांची सराव स्पर्धा झाल्यानंतर सहा थरांची स्पर्धा घेण्यात आली. सुरुवातीच्या पाच थरांची दहीहंडी कमी वेळेत उभारण्यात मरीआई गोविंदा पथकाने आघाडी मारली होती. त्यामुळे सहा थरांची दहीहंडी फोडण्यासाठी त्या पथकाला संधी देणे गरजेचे होते. परंतु त्याठिकाणी असलेले शिंदे गटातील दिलीप भोईर यांनी या खेळामध्ये राजकारण केल्याची चर्चा आहे.
कमी वेळेत सहा थर उभारण्याचा नियम सुरुवातीला लागू केला होता. परंतु मरीआई गोविंदा पथक हा थर उभारण्यात यशस्वी ठरेल, अशी भिती दिलीप भोईर यांना निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी कमी वेळेऐवजी चिठ्ठी उडवून सोडत पध्दतीने थर उभारण्याचा नियम अचानक सुरु केला. दिलीप भोईर यांनी राजकारण करून केलेल्या या प्रकाराबाबत गोविंदा पथकांनी तीव्र संताप निर्माण झाला.
पैशासाठी नव्हे नावासाठी सहभाग
ही स्पर्धा पैशासाठी नसून नावासाठी खेळत असल्याचे दिलीप भोईर यांना पथकातील सदस्यांनी उघडपणे सांगितले. यावेळी मेटपाडा गोविंदा पथकाला हिनतेची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर झिराड येथील दहीहंडी स्पर्धेत मेटपाडा गोविंदा पथकाने सहभागी होऊ नये, असे जाहीरपणे दिलीप भोईर यांनी सांगितले. त्यांच्या या वागणुकीमुळे गोविंदा पथकाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दिलीप भोईर यांच्या या मनमानी कारभाराबाबत गोविंदा पथकाने नाराजी व्यक्त केली असून सोशल मिडीयाचा आधार घेत दिलीप भोईर यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला.
शिस्तबद्ध नियोजन शेकापकडून शिकावे
रेवदंडा येथील श्री भैरवनाथ मित्रमंडळाच्यावतीने शिवसेना पुरस्कृत दहीहंडी सराव शिबीराचे आयोजन अन्यायकारक आहे. कमी वेळात थर लावतील, त्यांना एक ते पाच क्रमांक दिले जातील. हा नियम सर्व गोंविदा पथकांसमोर जाहीर करण्यात आला होता. परंतु आयत्यावेळी आयोजकांनी हा नियम बदलून चिठ्ठी सोडत पद्धतीचा नियम गोविंदा पथकावर लादला. रक्ताचे पाणी करून दोन ते तीन महिने सराव करण्यात आला. नियमांची पायमल्ली करीत त्यांना हीनतेची वागणूक देण्यात आली. अलिबागमध्ये आयोजन, नियोजन, पूर्णपणे शिस्तबध्द असते. हे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून शिकावे. त्या हंडीला मानाची हंडी म्हणून बोलले जाते. काल रेवदंडा येथे झालेल्या दहीहंडी सराव शिबीराच्या आयोजकाकडून गोविंदा पथकावर अन्याय झाला आहे. त्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे, असे गोविंदाप्रेमी सुनील पाटील यांनी सांगितले.






