| आगरदांडा | प्रतिनिधी |
चिंचघर मुख्य रस्त्यापासून ते चिंचघर गावापर्यंत रस्त्याचे मोरी बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शेकाप मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, माजी सभापती चंद्रकांत कमाने, म.ह. दिवेकर हायस्कूलचे चेरमन तुकाराम पाटील, माजी सरपंच विकास दिवेकर, माजी सरपंच संतोष पाटील, चंद्रकांत बैकर, ग्रामपंचायत सदस्य जयंत कासार, काशिनाथ कांबळे, सावली व चिंचघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचघर गावापर्यंत रस्त्याच्या मोरीचे हे काम जिल्हा नियोजन मंडळाकडून सुमारे पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याप्रसंगी पंडित पाटील म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास हा फक्त शेकापच करू शकतो. लवकरच 25/15 या हेड अंतर्गत या गावातील रस्त्याचे कामसुद्धा करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. चिंचघर व आजूबाजूच्यांच्या गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुरुड तहसीलदार यांच्या दालनात सभा लावणार असल्याचे पाटील यांनी आश्वासित केले. ग्रामस्थांनी पंडित पाटील यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.