उमेदवारीवरुन भुजबळांचा संताप; महायुतीच्या नेत्यांनाच दिली डेडलाईन

| नाशिक | प्रतिनिधी |

राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे. मात्र, महायुतीच्या (महायुती) अद्यापही काही जागांवरील तिढा कायम आहे. त्यामध्ये, प्राधान्याने नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात गोडसे की भुजबळ अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. कारण, जागावाटपात सातार्‍याची जागा भाजपाने स्वत:कडे ठेऊन घेतल्याने नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करत आहे. कारण, सातार्‍याची जागा सध्या राष्ट्रवादीकडे होती. मात्र, तिथे उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने सातार्‍याचा पेच सुटला आहे. आता, नाशिकच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आग्रही आहेत. त्यातच, आज हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली. त्यावेळी, भुजबळांनी उमेदवारी जाहीर न होण्यावरुन संताप व्यक्त केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, नाशिकच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. मात्र, या जागेवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाच तोडगा काढायचा असल्याने महायुतीतील वरिष्ठ नेते नेमकं काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीला ही जागा मिळाल्यास या जागेवर छगन भुजबळ निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे भुजबळांनी काही दिवसांपूर्वी कर्जाची रक्कम फेडण्यास सुरुवात केल्याचेही वृत्त माध्यमांत झळकले होते. तर, हेमंत गोडसेही विद्यमान खासदार असल्याने या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन जागेवरील आपला दावा कायम असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version