भुजबळ यांचा मराठा आंदोलकांना इशारा

जरांगेसह शिंदे सरकारवरही टीका
| जालना | प्रतिनिधी |
राज्यात नेत्यांना गावबंदी करण्याचे मराठा आरक्षण आंदोलकांचे प्रयत्न आता खपवून घेता कामा नयेत, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आपल्याच सरकारकडे केली. यापुढे या आंदोलकांना गावागावात जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे यांच्यावर भुजबळांनी तुफान हल्ला चढवला आणि सासऱ्याच्या घरी तुकडे मोडणारा अशी त्यांची संभावना केली. जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी आंदोलकांच्या दगडफेकीत सत्तर पोलिस जखमी झाल्यामुळेच नंतर लाठीहल्ला करावा लागला असा दावाही भुजबळांनी केला. त्यावेळी जरांगे यांच्या दबावाला बळी पडल्याबद्दल त्यांनी शिंदे सरकारवरही टीका केली.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला विरोध करण्यासाठी विविध ओबीसी संघटनांची पहिली मोठी सभा शुक्रवारी जरांगेच्या जालना जिल्ह्यातील अंबड येथे आयोजित करण्यात आली होती. तिला भुजबळ, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर आदी नेते हजर होते. ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण कायद्यानुसारच असल्याचा दावा करून भुजबळ यांनी त्याचा पूर्ण इतिहास यावेळी कथन केला. नरेंद्र मोदी, राहुल गांधी आदी नेत्यांनी राज्यातील ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी याविरोधात भुजबळ चांगलेच कडाडले, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का. माझे पोलिसांना आवाहन आहे की, हे गावागावात लावलेले गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना याकडे गांभिर्याने पाहीले पाहीजे, असेही ते म्हणाले.

तुम्ही जर असा पक्षपातीपणा कराल तर ओबीसी देखील गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित-मुस्लीम-आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही. पण ही दादागिरी बंद करु, असेही यावेळी भुजबळ म्हणाले. तुमची तब्येत खूप बिघडली आहे, आता तुम्ही रूग्णालयात गेले पाहिजे,अशी विनंती पोलिस करत होते. त्याचवेळी दगडाचा मारा सुरू झाला. पोलिस पटापट जमिनीवर पडले. 70 पोलिस काय पाय घसरून पडले का. कोणी मारले त्यांना असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला. या दगडफेकीत महिला पोलिस जखमी झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती कशी आहे, याची शहानिशा महिला आयोगाने करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

आजची ही सभा बघून ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची हिंमत यापुढे कोणाची होणार नाही, अशी ऐतिहासिक सभा आहे. ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही लढत असू तर आम्हाला धमकी द्याल, तर आम्ही आमच्या पदापेक्षा आमच्या समाजासाठी लढू. पद महत्त्वाचे नाही, तर समाज महत्त्वाचा आहे. सत्ता बदलत राहते. कोणासोबत जगायचे हे महत्त्वाचे आहे, असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी सांगितले.
आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होइल, ही आशा सामान्य धनगरांना आहे मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत, एका विशिष्ठ समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची धारणा आहे, अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.

Exit mobile version