विद्यमान आमदारांचा दिखावा ठरतोय सुरईकरांना त्रासदायक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
करोडो रुपयांचा निधी आणून विकास केल्याचा गाजावाजा विद्यमान आमदारांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात उंटावरुन शेळ्या हाकणे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुरूड तालुक्यातील बोर्लीकडून सुरईकडे जाणार्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन विद्यमान आमदारांच्या हस्ते सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र, भूमीपूजनाचा फलक लावण्यापलीकडे अजून काहीही झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांत तीव्र संताप आहे. त्यामुळे सुरईकडे जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे.
बोर्ली स्थानकापासून सुरईकडे जाणारा रस्ता खड्ड्यात आहे. पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरूप निर्माण होते. त्यामुळे या गावासह आदिवासी वाडीतील मुलांच्या शिक्षणावर अडथळा निर्माण होतो. नोकरी-व्यवसायानिमित्त जाणार्या नागरिकांचेदेखील प्रचंड हाल होतात. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था रायगडमार्फत काकलघर, चिंचघर ते सुरईतर्फे बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र या पावणे पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन कोटी 65 लाख 90 हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या आधी या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन विद्यमान आमदार दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याचे फलदेखील लावण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करीत या रस्त्याच्या कामाचा भूमीपूजन सोहळा करण्यात आला. परंतु, अनेक महिने उलटून या रस्त्याच्या बांधकामात एक दगडही पडलेला नाही, त्यामुळे हा रस्त्या केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न ग्रामस्थांचा आहे.
दरम्यान, सुरईकडे जाणारा मार्ग सुखकर होईल, अशी आशा सुरईकरांना वाटली होती. मात्र, आमदारांनी त्यांची घोर निराशा केली आहे. सदर रस्त्याची दुर्दशा झालेली असल्याने भागातील शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना अजून किती दिवस यातना सोसाव्या लागणार आहेत, असा सवाल गावकरी विचारत आहेत. 30 डिसेंबर 2023 या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. अजूनपर्यंत या रस्त्यावर साधी खडीदेखील टाकण्यात आली नाही. भूमीपूजन होऊन सहा महिने वीस दिवस होत पूर्ण झाले आहेत. तरीदेखील या रस्त्याचे काम सुरु झाले नसल्याने सुरईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अलिबाग तालुक्यातदेखील ग्रामसडक योजनेंतर्गत कामे आणून फक्त भूमीपूजन केल्याचा प्रकार अन्य ठिकाणीदेखील घडल्याची चर्चा सध्या सुरु आहे.