खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते रायगड तलाठी भवन इमारतीचे भूमीपूजन

| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा तलाठी भवन इमारतीचे भूमीपूजन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी आ. अनिकेत तटकरे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून काम करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले की, महसूल विभागाचा कणा म्हणून तलाठी यांच्याकडे पाहिले जाते, लोकांचा विश्‍वास तलाठी कार्यावर असतो. महसूल मालमत्तेची जबाबदारी तलाठ्यांवर असते. यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर राज्यव्यापी बैठक करण्यात येईल व रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही यावेळी खा. सुनील तटकरे यांनी दिली. या कामासाठी लागल्यास खासदार निधीतून 50 लाख देण्यात येतील, असेही खासदार तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी तहसीलदार बाबूराव निंबाळकर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, मा. नगराध्यक्ष संतोष श्रुंगापुरे, नगरसेविका वसुधा पाटील, विकास म्हात्रे, विजूशेठ कदम यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तलाठी, सर्कल, कोतवाल उपस्थित होते.

प्रांत, तहसीलदारांची कार्यक्रमाकडे पाठ
पेणचे प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी तलाठी भवन इमारतीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाकडे अक्षरशः पाठ फिरवली. या मागील कारण काय, हे गुलदस्त्यात असले तरी, कार्यक्रमा ठिकाणी दबक्या आवाजात एकच चर्चा सुरु होती; ती म्हणजे, ‘पाण्यात राहून माशांनी पाण्याशी वैर करु नये’. म्हणजेच काय, स्थानिक आमदारांचे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्याने संबंधित दोन्ही अधिकार्‍यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असावी.

कोणत्याही परवानग्या नसताना भूमीपूजनाची घाई का?
तलाठी भवनाची इमारत ही ग्रामपंचायत पाटणोलीच्या कार्यक्षेत्रात येत असून, ग्रामपंचायत पाटणोलीकडे बांधकामाच्या दृष्टीने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच सदरील जमीन एनए आहे की नाही, याबाबतदेखील साशंकाच, तसेच जो निधी आमदारांनी दिलाय, असे सांगण्यात येत आहे, त्या निधीविषयी शिफारस आमदारांनी केली आहे. निधीचा ठावठिकाणा अजून नाही, मात्र भूमीपूजनाची घाई.

Exit mobile version