आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उमरोली योजनेचे भुमीपूजन

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील खरवली उमरोली येथील शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ पहिल्यांदा रविवारी (दि.28) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. याच पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि.4) सायंकाळी 4 वाजता पुन्हा दुसर्‍यांदा आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमास माजी आ.पंडित पाटील, राजिप अध्यक्षा योगिता पारधी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, मोर्बा येथील शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, राजिप सदस्या आरती मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे माहिती शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी दिली.
उमरोली येथील 42 लाख 70 हजार रुपयांची मंजूर झालेली नळपाणी पुरवठा योजना खा.सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यातून मंजूर झाल्याचे रविवारी भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तर ही योजना शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, राजिप सदस्या आरती मोरे व माझ्या प्रयत्नांतून मंजूर झाल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.त्यामुळे उमरोलीची ही नळपाणी पुरवठा योजना चांगलीच चर्चेत आली असून शनिवारी आ.जयंत पाटील याबाबतीत काय झोड उठविणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे.
यादिवशी आ.जयंत पाटील यांचा स्थानिक विकास कार्यक्रम, जिल्हा वार्षिक नियोजन मंडळ व जिल्हा परिषद सेस फंडातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी दिली.

Exit mobile version