| पुणे | वृत्तसंस्था |
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच खडसावले आहे. इतके दिवस ललित पाटील तुमच्या ताब्यात असताना त्याला नीट सांभाळता आले नाही आणि आता भूषण आणि अभिषेककडे काय तपास करणार, असे म्हणत पोलिसांना न्यायाधीशांनी खडसावले.
ललित पाटील पळून गेल्याने मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे पोलिस कोठडी मागू नका, असेही यावेळी न्यायाधीशांनी म्हटले. यावेळी भूषण आणि अभिषेक या दोघांना न्यायालयाने तुमचे वकील कोण, असे विचारले असता आम्ही वकील दिलेले नाहीत, असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी या दोन आरोपींना सरकारी खर्चातून वकील देण्याचे आदेश दिले.