भूतीवली धरणामुळे पाली वसाहत बाधित

दरडीच्या धोक्यामुळे ग्रामस्थांचे स्थलांतर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाली भूतीवली लघुपाटबंधारे बंधारे प्रकल्प बांधण्यात आला. त्यावेळी भूतीवली आणि पाली गाव या गावांचे विस्थापन केले आणि नव्याने वसवलेल्या त्याच पाली वसाहतवर सध्या दरडी कोसळल्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, 2021 मध्ये या पाली वसाहतीवर दरड कोसळली होती आणि सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाली वसाहतीवर दरडीचे संकट घोंघावत असून, येथील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण केले आहे.

पाली भूतीवली धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या ठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्तांना भूखंड दिले आणि वसाहत निर्माण झाली. त्या ठिकाणी 65 कुटुंबं राहात असून, त्यातील 15 कुटुंबं ही दरडीच्या बाजूला असून, त्या ठिकाणी 2021 मध्ये डोंगरातील दरड कोसळून मातीचा मलबा वाहून घराजवळ येऊन पोहचला होता. त्याबाबत स्थानिक लोकांनी गेल्या दहा वर्षात साततयाने प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना दरडीबद्दल आपल्या अडचणी मांडल्या आहेत. परंतु, प्रशासन गेल्या अनेक वर्षात कोणत्याही कार्यवाही केल्या नसल्याने स्थानिक ग्रामस्थ प्रशासनावर नाराज आहेत.

सतत सुरू असलेला पाऊस यामुळे दरडी कोसळण्याचा धोका असल्याने कर्जत तहसील कार्यालयाच्या चिंचवली तलाठी प्रवीण साळुंखे यांनी वसाहतीमध्ये येऊन 15 कुटुंबाना नोटिसा दिल्या होत्या. त्या प्रमाणे त्या कुटुंबांना राहत्या घरातून काढून डिकसल येथील एका मंगल कार्यालयात केली होती. मात्र, तेथे जाण्यास स्थानिक ग्रामस्थांनी नकार दिल्याने शेवटी माजी उपसरपंच सचिन गायकर, मिलिंद पारधी यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी पाली नवीन वसाहतीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तेथे केवळ राहण्याची व्यवस्था असून, खाण्याचे कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासन आम्हाला घरातून बाहेर काढून शाळेत नेऊन ठेवण्याचा घाट कशासाठी घालत आहे, अशी विचारणा स्थानिक ग्रामस्थ प्रदीप झुगरे यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासन किती कुचकामी काम करते हे आमच्या वसाहतीमध्ये आल्यावर दिसून येते, आमची वाडी दरडग्रस्त आणि धोकादायक आहे असा फलक लावला आहे. तो फलक देखील गेल्यावर्षी लावलेला फलक आहे. तो बदलण्याची तसदीदेखील प्रशासनाने घेतली नाही आणि त्यामुळे प्रशासन किती निष्क्रिय हे दिसून येत आहे.

मिलिंद पारधी, स्थानिक ग्रामस्थ

आम्ही वर्षानुवर्षे प्रशासनाला अर्ज देऊन तक्रारी करीत आहोत. पण दहा वर्षात प्रशासनाने काहीही केले नाही आणि त्यामुळे आम्हाला दरवर्षी दरडी कोसळण्याच्या भीतीमध्ये राहावे लागते. गेल्या काही दिवसात आम्ही रात्री जागे राहतो आणि त्यामुळे आमचे मरण आम्हीच डोळ्यादेखत पाहायचे का?

सचिन गायकर, माजी उपसरपंच

आम्ही सर्व यंत्रणा इर्शाळगड येथे अडकली असून, तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांना सायंकाळपर्यंत पाठवून देत आहे. त्याच्यासोबत अभियंता पाठवून दिला जाईल आणि एक अहवाल तयार केला जाईल. त्या अहवालाची अंमलबजावणी प्रशासनाकडून काही दिवसात सुरू केली जाईल. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सूचना ऐकून तसे वागावे आणि सहकारी करावे.

अजित नैराळे, प्रांत अधिकारी, कर्जत
Exit mobile version