पर्यावरण रक्षणासाठी सायकल रॅली

कर्जत नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम
। नेरळ । वार्ताहर ।
माझी वसुंधरा अभियानाच्या निमित्ताने कर्जत नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यावरण रॅली काढण्यात आली. शहरातील असंख्य सायकलपटू यांनी पर्यावरण रॅलीमध्ये सहभागी होत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. तर सायकल चालविणारे यांची संख्या आणि त्यांना शहरात वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील काही रस्त्यावर सायकल ट्रक बनविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.
कर्जत नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 मध्ये देशात थ्री स्टार मानांकन मिळविले आहे. आता देश पातळीवर फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी नगरपालिका सज्ज झाली आहे. त्याचवेळी राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानमध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात शहरात पर्यावरण रॅली आयोजित करण्यात आली होती. नगरपालिका हद्दीमध्ये गेली वर्षभर माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे.त्या माध्यमातून शहरात हरित पट्टा निर्माण केला असून मोठ्या प्रमाणावर झाडे लावली जात आहेत.त्यामुळे पर्यावरण रक्षणात आघाडीवर असलेल्या या शहरातील नागरिकांनी देखील पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे यासाठी पर्यावरण रॅलीचे आयोजन केले होते.पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यावरण रॅलीमध्ये शहरातील असंख्य सायकल स्वार सहभागी झाले होते.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे नगरपरिषदेच्या सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित केलेल्या पर्यावरण सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
सर्व सायकलपटू यांना नगरपरिषदकडून पर्यावरण जनजागृतीचे संदेश देणारे टी शर्ट पालिकेकडून देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघालेली पर्यावरण रॅली कचेरी रोडने मुद्रे अशी मुद्रे नाना मास्तर नगर येथे पोहचली. तेथून गुरूनगर मार्गे स्वप्न नगरी आणि तेथून कर्जत आमराई रस्त्याने दहिवली येथील पेट्रोल पंप भागातून नवीन वसाहत रस्त्याने संजय नगर,शिवाजी महाराज नगर अशी वेणगाव रस्त्याने कोंडीवडे रस्त्याने आकुरले आणि तेथून पुन्हा कर्जत शहरात आली. बाजारपेठ, महावीर पेठ, स्टेशन रोड अशी ही सायकल रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून नगरपरिषद कार्यालय येथे समाप्त झाली.पर्यावरण रॅलीमध्ये कर्जत शहरातील लहान थोर असे असंख्य सायकल पटू सहभागी झाले होते. त्याचवेळी पालिकेचे विवेक दांडेकर, मधुरा चंदन, सुदाम म्हसे तसेच अन्य सहकारी आणि शहरातील नागरिक देखील सहभागी झाले होते. शाळांचे विद्यार्थी यांनी या पर्यावरण रॅलीमध्ये जनजागृती विषयक पथसंचलन केले.तर पालिकेच्या पथकाने पर्यावरण राखण्याचे आवाहन करणारे संदेश यांच्यासोबत रॅली काढली.

कर्जत शहरात पर्यावरण रॅलीमध्ये दरवर्षी नागरिकांचा सहभाग वाढलेला दिसत आहे. त्यात सायकल चालविणारे यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे शहरातील काही रस्त्याच्या बाजूला सायकल ट्रक बनविण्याची पालिकेची योजना आहे. -सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष

आम्ही शहरातील पर्यावरण राखण्यासाठी वृक्ष लागवडीवर आम्ही भर दिला आहे. त्यात 2021 मध्ये 5000 झाडे लावली असून यावर्षी 25 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. -डॉ पंकज पाटील, मुख्याधिकारी

Exit mobile version