सायकलींमुळे मुलींच्या शिक्षणाला गती

चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शहराच्या तुलनेने ग्रामीण, दूर्गम भागात शैक्षणिक गळतीचं प्रमाण खूप आहे. अपुर्या सोयी-सुविधांमुळे हे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतंच जातं. नैसर्गिक आपत्ती, बेरोजगारी, प्रवासाचे वाहन नसणे, अशी अनेक कारण त्याला जबाबदार आहेत. असे अनेक अडथळे सोसून मुलींना शाळेत पाठवण्यास दूर्गम भागातील पालकांना शक्य होत नाही. परिणामी, मुलींच शाळेतील गळतीचं प्रमाण वाढत जातं. या सार्या गोष्टींचा विचार करुन सीएफटीआय संस्थेने पुढाकार घेत महाराष्ट्रातील शिक्षणाची गंगा तळागाळात पोहोचविण्यासाठी सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या उपक्रमांतर्गत सायकल वाटपाचा उपक्रम सुरु केला. त्यामुळे दूर्गम भागातील मुलींच्या शिक्षणाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या विश्‍वस्त चित्रलेखा पाटील यांनी केले. पीएनपी नाट्यगृहात शनिवारी (दि. 21) आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी सोई फाऊंडेशनच्या तरुणा सोई, रेश्मा शेजपाल, अमित देशपांडे, भूषण चवरकर, अशोक थळे, नरेश गोंधळी, सत्यविजय पाटील, विक्रम पाटील, राजेश म्हात्रे, नचिकेत कावजी व इतर मान्यवर तसेच अलिबाग तालुक्यातील चिंचवली, माणकुळे, पोयनाड, खंडाळे, कुर्डुस आदी ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास 360 हून अधिक मुली, या गावातील सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग तालुक्यातील चिंचवली, माणकुळे, पोयनाड, खंडाळे, कुर्डुस आदी ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास 360 हून अधिक मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. तर, बाकी सायकलींचे रोहा तालुक्यातील गरजू मुलींना वाटप करण्यात येणार आहे.

यापुढे मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले कि, तीन वर्षापूर्वी लावलेले सीएफटीआय या चिमुकल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून केवळ रायगड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती असो, किंवा शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सीएफटीआय खंबीरपणे गरजूंच्या पाठीशी उभी आहे. शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आपण प्रत्येकजण चालत आहोत. त्याच सावित्रींच्या लेकिंचे भविष्य उज्ज्वल करण्याचा वसा या संस्थेने वसा घेतला आहे. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात 1 लाख सायकलींचे वाटप करण्याचेही चित्रलेखा पाटील यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभंकर टकले व विक्रांत वार्डे यांनी केले.

सावित्रींच्या लेकींची पायपीट थांबली
मुलींची शालेय शिक्षणासाठी घरापासून शाळेपर्यंत होणारी पायपीट कायमची थांबावी, शालेय शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबू नये यासाठी सीएफटीआयच्या विश्‍वस्त चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून हजारो मुलींना आतापर्यंत सायकलींचे वाटप करण्यात आले असून, त्यांच्या शिक्षणातील अडसर ठरणारी पायपीट कायमची बंद झाली आहे. लाभार्थ्यांची निवड करताना केवळ दूर्गम आणि अतिदुर्गम भागच नाही तर शहरी भागातील झोपडपट्टी तसेच गलिच्छवस्तीतील मुलींनाही प्राधान्य देण्यात आलं आहे. सीएफटीआयच्या या उपक्रमामुळे मुलींच्या शिक्षणाला निश्‍चितच गती मिळेल. – सागर चवरकर,पालक

पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न
सध्या काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत रोहा तालुक्यातील शेणवई गावात प्रयोग सुरु आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात 400 गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्याचा मानस असल्याचेही चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात चित्रलेखा पाटील विविध उपक्रम राबवित आहेत. मुलींच्या शिक्षणाचा विचार करुन त्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या भव्य उपक्रमाचा एक भाग होता आलं, हे सोई फाऊंडेशनचं भाग्यच आहे. आजवर अलिबागमधील मुलींचं कौतुक अनेकांकडून ऐकले होते, आज ते प्रत्यक्षात पहायला मिळाले. भविष्यात चित्रलेखा पाटील यांच्यातर्फे राबविण्यात येणार्या समाजकार्यात नक्कीच सहभागी होऊ.

– तरुणा सोई, सोई फाऊंडेशन
Exit mobile version