। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई डीआरआयने केली आहे. एका इसमाला तब्बल 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडे 16 किलो हेरॉईन सापडलंय. हे हेरॉईन उच्च दर्जाचं असल्याची माहिती समोर आलीय. बुधवारी मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिथे ड्रग्ज सापडलेत, ती लपवलेली जागा पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेलेत.
डीआरआयला एक व्यक्ती 16 किलो हेरॉईन घेऊन मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने तपास यंत्रणा कामाला लागली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत तपास करण्यात आला. या तपासामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते. पण कुणालाही कळू नये यासाठी या बॅगमध्ये खास व्यवस्था करण्यात आलेली होती. त्या व्यक्तीची ट्रॉली बॅग तपासण्यात आली. या बॅगेत असलेल्या एका फेक कॅविटीमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले असल्याचं तपासातून समोर आलंय. त्यानंतर डीआरआयने या व्यक्तीला अटक केली. तसंच त्याच्याकडे आढळून आलेलं ड्रग्जही जप्त केलं.
सापडेलं ड्रग्ज हेरॉईन असल्याचं तपासातून उघड झालं. या ड्रग्जचं वजन केलं असता 16 किलो असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर या ड्रग्जची किंमत 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचीही माहिती डीआरआयने दिली आहे. याप्रकरणी आता एनडीपीएस कायद्याखाली केरळमधील या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची सध्या कसून चौकशी केली जातेय. या व्यक्तीला एका विदेशी नागरिकाने एक हजार अमेरिकन डॉलर दिले होते. ड्रग्ज मुंबईत घेऊन येण्यासाठी कमिशन म्हणून ही रक्कम आरोपीला देण्यात आली होती, अशी माहिती चौकशीतून उघडकीस आलीय.