। मुंबई । प्रतिनिधी ।
भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. ही कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघ पूर्ण जोर लावणार हे निश्चित आहे, कारण ही कसोटी गमावल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या स्वप्नांनाही मोठा धक्का बसू शकतो. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या कामगिरीवर भारतीय संघाची भीस्त असणार आहे. अशातच जसप्रीत बुमराहसह भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन यांना मोठा धक्का बसला आहे.
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अव्वल स्थान गमावले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज कागिसो रबाडान अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच मीरपूर येथे बांगलादेशवर सात विकेटने विजय मिळवला. या सामन्यात कागिसो रबाडाने कसोटीतील 300 विकेट्सचा टप्पा ओलांडला. 2019नंतर कागिसो प्रथमच कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आला आहे. त्याने जोश हेझलवूड आणि रविचंद्रन अश्विन यांना मागे टाकत तीन स्थानांनी झेप घेतली. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने दुसरे स्थान कायम राखले आहे, तर जसप्रीतची तिसर्या व अश्विनची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.