। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही पांड्यानं केवळ तीनच चेंडू टाकले होते. यानंतर टीम इंडियानं मागील तीन सामने त्याच्याशिवाय खेळले आहेत.
भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात खेळलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. याच कारणामुळे न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना पांड्या खेळू शकलेला नाही. आता त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेला पांड्या उपांत्य फेरीपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.