| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांचे सुपुत्र सनी चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. या पक्षातील मोठ्या नेत्यांच्या नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्तींना पक्षात घेण्याकडे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र थोरवे यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यातून गौरकामत ग्रामपंचायतचे माजी सरपंच, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांना शिवसेना शिंदे गटाने जोरदार धक्का दिला आहे. त्यांचे सुपुत्र आणि कर्जत शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सनी चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आमदार थोरवे यांच्या निवासस्थानी सनी चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सनी चव्हाणसारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या घरातील कार्यकर्त्याने प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.