बोगद्यांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेचा मोठा निर्णय

| मुंबई | वृत्तसंस्था |

महामार्गांवरील बोगद्यांच्या बांधकामादरम्यानची सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वे देशभरातील सर्व 29 निर्माणाधीन बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट अर्थात सुरक्षा लेखा परीक्षण करणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्यात झाला आहे.

उत्तराखंडमधील बोगद्याचे काम सुरु असताना तो कोसळल्याने 41 मजूर अडकून पडले होते. त्यामुळे बोगद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता महामार्गावरील बोगद्यांच्या कामात कोकण रेल्वे सहकार्य करणार आहे. या करारांतर्गत कोकण रेल्वे महामंडळ हे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रकल्पांना सेवा प्रदान करणार आहे. ज्यामध्ये बोगदा बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित डिझाइन, रेखाचित्र आणि सुरक्षा पैलूंचा सर्वसमावेशक आढावा समाविष्ट आहे. याखेरीज कोकण रेल्वे बोगद्यांची सुरक्षा तपासणी देखील करणार आहे. आवश्यकता भासल्यास उपचारात्मक उपाय सुचविणार आहे. या व्यतिरिक्त कोकण रेल्वे आता महामार्ग अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेणार आहे.

उत्तराखंडच्या घटनेनंतर महामार्ग विभागाकडून बांधल्या जाणाऱ्या बोगद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरी यापुढे भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून सावध भूमिका घेण्यात येत आहे.

Exit mobile version