अंतिम फेरीत मिळवले स्थान
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेने बुधवारी (दि.31) मोठा कारनामा केला आहे. त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता त्याने भारतीयांच्या पदकांच्या आशाही उंचावल्या आहेत.
बुधवारी झालेल्या पात्रता फेरीत स्वप्नील 590 गुणांसह 7 व्या क्रमांकावर राहिला. या फेरीत पहिल्या 8 नेमबाजांना अंतिम फेरीत पदकासाठी खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे आता स्वप्नीलही 1 ऑगस्ट रोजी पदक मिळवण्यासाठी अंतिम फेरीत निशाणा साधताना दिसेल. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकाराची अंतिम फेरी 1 ऑगस्टला दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे.
त्याने 2022 मध्ये इजिप्तला झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये चौथे स्थान मिळवत ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. त्यानंतर मे 2024 मध्ये त्याने ट्रायल्समधून पॅरिस ऑलिम्पिकला जाणार्या भारताच्या नेमबाजी संघात स्थान मिळवले होते. आता त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.






