। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदार निलंबित करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र आजही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या निलंबनावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. अशातच आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे.