| पुणे | वृत्तसंस्था |
राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे.
एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास आता पोलीस करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला असून तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टेम्पोमध्ये आढळून आले आहे. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होते, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पोलिसांकडून सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व 24 तास तपासणी सुरू आहे. त्यानुसार, आज सकाळी तपासणी दरम्यान, आढळून आलेल्या टेम्पोची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये, पांढरे बॉक्स होते, या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच चालकाकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये दागिने असून मुंबईतून ते पुण्याच्या कार्यालयात आणले गेले आहेत. त्यामुळे, आपण आयकर विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुढील चौकशीसाठी त्यांनाही बोलवले आहे, अशी माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली.