। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान-नेरळ-कळंब मार्गावरील उल्हास नदीवरील दहिवली- मालेगाव पुलावर भगदाड पडले आहे. 1970 च्या दशकात बांधण्यात आलेल्या या पुलाच्या निर्मितीनंतर या पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात पाणी वाहते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन पुलाच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. दरम्यान, या पुलावर मोठा खड्डा पडला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बॅरिस्टर अंतुले हे राज्याचे मुख्यमंत्री असताना कर्जत पंचायत समितीचे सभापती श्रीराम भाऊ पाटील यांनी उल्हास नदीवर दहीवली- मालेगाव येथे पुल बांधण्यात यावा, यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी बांधण्यात आलेल्या पुलाच्या उंचीचा प्रश्न कायम उपस्थित केला जात होता.
कमी उंचीच्या आणि 150 मीटर लांब असलेल्या या पुलावरून पावसाळ्यात सतत पाणी वाहते. त्यामुळे स्थानिक अडकून पडतात. परिणामी, नव्याने जास्त उंचीचा पुल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षे केली जात आहे. मात्र आजमितीस त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.
बांधकाम विभागाने वेळोवेळी पुलाची दुरुस्ती न केल्याने गुरुवारी (दि.28) रात्री पुलाला मोठे भगदाड पडले. त्यामुळे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी श्रावण जाधव यांनी खड्ड्यामुळे मोठी गाडी जाण्यास अडथळे येत असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. तसेच कोणताही अपघात होऊ नये, याकरीता झाडाच्या फांद्या तोडून उभ्या केल्या.
याबाबत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय हजारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधला. तसेच याबाबत माहिती दिली. मात्र दिवसभरात एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ आणि मनसेचे तालुका उपाध्यक्ष यशवंत भवारे यांनी दिली आहे.