| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी (कोलाड) बाजारपेठेतील बँक ऑफ इंडियासमोर दीड ते दोन फूट मोठा खड्डा पडल्यामुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांसहित प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे आंबेवाडी बाजारपेठेत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या खड्ड्यातून प्रवास करताना दोन दिवसांपूर्वी मिनिडोअर पलटी होता होता थोडक्यात बचावला. या खड्ड्यामुळे मोठा अपघात घडण्याच्या आधी हा खड्डा सिमेंट काँक्रेटने भरून तात्पुरती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 18 वर्षांपासून सुरु असून, जवळजवळ सव्वा तप पूर्ण झाले. यामुळे या कालावधीच्या आधी प्रभू रामाचा वनवास संपला होता. परंतु, अद्याप मुंबई-गोवा महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वनवास कधी संपणार, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला दिरंगाई होत असल्यामुळे महामार्गावरील तळवली, तिसे, वरसगांव, आंबेवाडी, गोवे, पुई, खांब, नागोठणे या गावांनजीक रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी झाली आहे. यामुळे या महामार्गांवरील गाव, ग्रामस्थ हॉटेल, भाजी, किराणा, व्यावसायिक दुकानदारसह प्रवासी नागरिक हतबल झाले असून, दिवसेंदिवस येथील नागरिकांना मार्गावरून होत असलेली वाहतूक कोंडी, पाण्यातील तसेच खड्ड्यातील प्रवास याला सामोरे जावे लागत असल्याने सर्वत्र एकच संताप व्यक्त केला जात आहे.






