किनेश्‍वरवाडीच्या रस्त्यावर दरडींसोबत महाकाय दगड कोसळले

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुक्यातील किनेश्‍वरवाडी येथे नियोजित धरणासाठी ठेकेदाराकडून सेवानिवृत्त महसूली अधिकारी व खासगी व्यक्तींमार्फत जमिनीची मोठया प्रमाणात खरेदी करण्यात आल्यानंतर ‘गुगल मॅप’वर ज्या भागाचा ‘इन्व्हेस्टर पॉईंट’ असा उल्लेख येऊ लागला आहे; त्या किनेश्‍वरवाडीच्या रस्त्यावर मातीच्या ढिगार्‍यासोबत महाकाय दगड कोसळल्याची घटना घडल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तहसिलदार कपिल घोरपडे आणि पोलीस ठाण्यातील हवालदार स्वप्नील कदम यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांना दरडीच्या धोक्याची कल्पना देऊन सुरक्षितस्थळी मुक्कामी राहण्यास आवाहन केले.

पोलादपूर तालुक्यातील किनेश्‍वरवाडी येथील नियोजित धरणासाठी 2009 मध्ये लघुपाटबंधारे विभागामार्फत कार्यक्रम तयार करण्यात येऊन अनुकूलता दर्शक अहवाल तयार करण्यात आल्यानंतर या भागातील धरणासाठी संपादित करण्यात येणार्‍या संभाव्य जमिनींचे मोठया प्रमाणात खरेदी व्यवहार महसूल विभागाच्या अधिकार्‍यामार्फत तसेच खासगी व्यक्तींमार्फत करण्यात आल्याने या क्षेत्रासाठी ‘गुगल मॅप’ या ऍपवर ‘इन्व्हेस्टर पॉईंट’ असा उल्लेख येऊ लागला आहे. याठिकाणी किनेश्‍वर ते किनेश्‍वरवाडी हा रस्तादेखील भूसंपादनाचा मोबदला अदा केल्याविना करण्याचे काम सुरू झाले होते. आड चांभारगणी येथून साधारणपणे 150 मीटर अंतरावरील रस्त्यावर लगतच्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे आणि तीन महाकाय दगड कोसळून दरडप्रवण क्षेत्र निर्माण झाले. यामुळे गावाला धोका निर्माण होऊन तहसिलदार कपिल घोरपडे यांनी 17 कुटूंबांपैकी 7 कुटूंबातील 24 सदस्यांना किनेश्‍वरवाडी अंगणवाडी येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले. यावेळी अंगणवाडीचा खंडीत करण्यात आलेला विद्युतपुरवठा सुरळीत करून या ग्रामस्थांना रात्री दिवाबत्तीच्या उजेडामध्ये राहण्याची सुविधा केली. तहसिलदार घोरपडे यांच्यासोबत महसूली कर्मचारी देखील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी सहभागी झाले होते. हा किनेश्‍वर ते किनेश्‍वरवाडी रस्ता बॅरिकेटस् टाकून वाहतुकीस बंद करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना आड ते किनेश्‍वर मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा लागणार आहे.

पोलादपूर पोलीस ठाण्याचे हवालदार स्वप्नील कदम यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांना दरडीच्या धोक्यापासून सावध राहण्यासह किनेश्‍वर ते किनेश्‍वरवाडी रस्त्याचा वापर करण्याचे बंद करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version