यजमान जर्मनीचा मोठा विजय

| जर्मनी | वृत्तसंस्था |

यजमान जर्मनीने युरो कप 2024ची दणक्यात सुरूवात केली. जर्मनीने आपल्या पहिल्याच सामन्यात स्कॉटलँडचा 5-1 असा पराभव केला. जर्मनीकडून फ्लोरियन, जमाल, काई हावेर्त्झ, निकोलस, एमरे कान यांनी प्रत्येकी एक गोल केला. मात्र, या सर्वांमध्ये जमाल मुसिआलाचा गोल पाहण्यासारखा होता.

जर्मनी आणि स्कॉटलँड सामन्यात यजमान जर्मनीने 10 व्या मिनिटापासूनच गोल करण्यास सुरूवात केली होती. फ्रोलियान विर्त्झने 10 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत जर्मनीचे खाते उघडले होते. त्यानंतर जमाल मुसिआलाने सामन्याच्या 19 व्या मिनिटाला पुन्हा एकदा स्कॉटलँडची गोलपोस्ट भेदली. जर्मनीच्या मिडफिल्डरने स्कॉटलँडच्या बचाव फळीला आपल्या ड्रिबलिंगने चकवा दिला. त्याने दाखवलेल्या चपळाईसमोर स्कॉटलँडची बचावफळी निष्प्रभ दिसली. मुसिआलाने याचाच फायदा उचलत 19 व्या मिनिटाला जर्मनीचा दुसरा आणि आपला पहिला गोल केला.

मुसिआलाच्या गोलनंतर हावेर्त्झने 45व्या मिनिटाला पेनाल्टीवर जर्मनीचा तिसरा गोल केला. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये स्कॉटलँडने जर्मनीचा गोलंचा धडाका थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र 68व्या मिनिटाला निकोलसने जर्मनीचा चौथा गोल करत आघाडी 4-0 अशी वाढवली. दरम्यान, सामना संपवण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक असताना जर्मनीला स्कॉटलंडवर दया आली असावी कारण जर्मनीच्या अँटिओनोने सेल्फ गोल करत स्कॉटलंडला खाते उघडून दिले. अखेर एक्स्ट्रा टाईममध्ये जर्मनीच्या एमरे कानने संघाचा पाचवा गोल करत जर्मनीला 5-1 असा मोठा विजय मिळवून दिला.

Exit mobile version