| अलूर | वृत्तसंस्था |
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सिक्कीमवर दणदणीत विजय मिळवून जोरदार सलामी दिली. सात गडी राखून विजय मिळवणाऱ्या मुंबईने 90 धावांचे लक्ष्य 12 षटकांत पार करून 228 चेंडू राखून विजय मिळवताना सरासरी कमालीची उंचावली. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयस्वाल आणि जखमी पृथ्वी शॉ अशा नावाजलेल्या खेळाडूंविना खेळतानाही मुंबईने आपली तादक दाखवली.
सिक्कीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु पहिल्या षटकापासून त्यांची घसगुंडी सुरू झाली. या 89 धावांत कर्णधार नीलेश लामिचानेच्या 29 आणि अवांतर 16 धावांचा समावेश आहे. त्यांच्या इतर सर्व फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. झटपट विजयाचे उद्दिष्ट ठेवून फलंदाजीस उतरणाऱ्या मुंबईला अंगरीश रघुवंशी आणि जय बिश्त यांनी जोरदार सलामी दिली, परंतु त्यापैकी एकाला अर्धशतक करता आले नाही. विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अजिंक्य रहाणेला मैदानात यावे लागले. मुंबईचा दुसरा सामना केरळविरुद्ध 25 तारखेला होणार आहे.
केरळचा सौराष्ट्रला धक्का
केरळ संघाने गतविजेत्या सौराष्ट्र संघाला सलामीलाच धक्का देताना तीन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्रचा डाव 185 धावांत संपुष्टात आला. यात विश्वराजसिंह जडेजाने 98 धावांची खेळी केली. केरळकडून अकहिनने चार; तर बासिल थंपी आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले . हे माफक आव्हान पार करताना केरळचीही 4 बाद 61 अशी घसरगुंडी उडाली होती. संजू सॅमसन 30 धावाच करू शकला.
संक्षिप्त धावफलक
सिक्कीम 38.1 षटकांत 89 (नीलेश लामिचाने 29, तुषार देशपांडे 7-1-19-3, मोहित अवस्थी 7-3-9-2, अर्थव अंकोलेकर 6-3-13-2) पराभूत वि. मुंबई ः 12 षटकांत 3 बाद 90 (अंकरिष रघुवंशी 30- 28 चेंडू, 4 चौकार, जय बिश्त 28- 22 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, अजिंक्य रहाणे नाबाद 15)
