एक जण गंभीर जखमी
| सुकेळी | वार्ताहर |
मुंबई -गोवा महामार्गावरील नागोठणे ते सुकेळी खिंड येथील अपघातांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून, याबाबतीत अद्यापही कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्यामुळे वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सुकेळी खिंडीमध्ये अपघातांची मालिका सुरू असतांनाच मंगळवारी (दि.18) रोजी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवर दुचाकीस्वार विनायक नथुराम पवार, (27) रा. वहुर, ता. महाड हे आपल्या ताब्यातील के टी एम मोटरसायकल घेऊन पनवेल बाजुकडुन महाडच्या दिशेने जात असतांना खांब बाजुकडील सुकेळी खिंडीच्या उतारावर दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात विनायक यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ वाकणं टॅबच्या वाहतूक पोलिसांनी जवळच असलेल्या जिंदाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर जिंदाल रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून माणगाव सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास कोलाड पोलिस स्टेशन करीत आहेत.