। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील जकात नाका सिग्नलवर सोमवारी (दि. 27) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. जकात नाका सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवले असता दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वाघोलीतून पुण्याच्या दिशेने मालवाहतूक करणारा ट्रक (एमएच 12 व्हीएफ 6441) येत होता. त्यावेळी जकात नाका चौकातील सिग्नलवर एका दुचाकीवर तिघे जण थांबले होते. भरधाव वेगाने असणाऱ्या ट्रकने मागून दोघांना धडक दिली. त्या जोरदार धडकेमुळे तिघे जण फरफटत गेले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील तरुण मूळचे लातूरचे असून ते वाघोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच विमानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना त्वरीत रुग्णालयात पाठवले. परंतु तिघांपैकी एकाचा घटनास्थळावर मृत्यू झाला होता. दुसऱ्या जखमी झालेल्या युवकाचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू झाला, तर तिसऱ्या युवकावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तसेच, या प्रकरणी ट्रकचालक श्यामबाबू रामफळ गौतम याला अटक करण्यात आली आहे.