| पनवेल | वार्ताहर |
खारघर रेल्वे स्थानकात असलेल्या रिक्षा स्टँडमध्ये टू व्हीलर वाहने पार्क केली जात असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांना वारंवार प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत सोमवार (दि.29) रोजी खारघर वाहतूक शाखेने 108 दुचाकीवर दंडात्मक स्वरूपात इ चलनद्वारे कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्या मार्गदर्शनात रिक्षा स्टँडमध्ये पार्क केलेल्या या दुचाकींवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी देखील अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान 500 रुपयांचा दंड प्रथम वेळेत या दुचाकींना लावण्यात आला. दुसऱ्या वेळेला देखील अशा स्वरूपात वाहतुकीचे नियम पाळले गेले नसतील तर तो दंड 1500 पर्यंत असेल अशी माहिती काणे यांनी दिली आहे. खारघर स्टेशन येथील रिक्षा स्टँडमध्ये दुचाकी वाहने लावू नयेत असे आवाहन यावेळी पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी केले आहे.