| पनवेल | वार्ताहर |
पनवेल-मुंब्रा मार्गावर कळंबोळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी असलेल्या दुचाकी चालकाचा पाच दिवसांनंतर मृत्यू झाला आहे. कळंबोळी पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या अपघातातील मृत रामसिंग धरमसिंग कासनिया (47) असे असून तो कळंबोळी से. 3 ई मध्ये राहण्यास होता. रात्रीच्या सुमारास रामसिंग दुचाकीवरून जात असताना मुंब्रा-पनवेल हायवेजवळ अग्निशमन दलाच्या इमारतीसमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पलायन केले होते. त्यावेळी पोलिसांनी जखमी रामसिंग याला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.