। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव-पुणे रस्त्यावर खर्डी गावच्या हद्दीत साबळे क्रेशरजवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.17) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद सहदेव रामचंद्र सोंडकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. मधुकर रामचंद्र सोंडकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीने निजामपूर ते माणगाव जात असताना त्यांची गाडी साबळे क्रेशर जवळील वळणाच्या रस्त्यावर आल्यावर समोरून येणार्या अज्ञात वाहनावरील चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन स्कुटीला धडकून अपघात घडला. या अपघातात मधुकर सोंडकर यांच्या मानेच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनावरील चालक पळून गेला. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.