कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

। मुंबई । वृत्तसंस्था ।

वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सात दिवसांनी मृत्यू झाला आहे.

मुंबईतील वरळी परिसरात शनिवारी (दि. 20) एक भीषण अपघात घडला. वांद्रे वरळी सी लिंकजवळ असलेल्या अब्दुल गफार खान मार्गावर एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालवत असलेला विनोद लाड (28) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो कोमात गेला असून त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड हा मूळ मालवणमधील रहिवाशी असून तो ठाण्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर काम करत होता.

याप्रकरणी कारचालक किरण इंदुलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, घटनेतील बीएमडब्ल्यू गाडी ठाण्यातील प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version