हृदयद्रावक! टेम्पो अंगावर पडून बाईकस्वाराचा जागीच मृत्यू; मित्राने फोडला हंबरडा

। नेरळ । वार्ताहर ।
बदलापूर येथून खोपोलीकडे निघालेल्या बाईकचा कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ जिते या वळणावर मंगळवारी (दि.21) अपघात झाला. या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गौरव लाड असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून विरुद्ध दिशेने येणार्‍या मालवाहू टेम्पो चालकाने थेट बाईकस्वाराला येऊन ठोकर दिली. दरम्यान, हा टेम्पो बाईकस्वाराच्या मागे बसलेल्या तरुणाच्या अंगावर पडल्याने यात गौरवचा जागीच मृत्यू झाला.


त्रबदलापूर येथे राहणारे गौरव लाड व त्याचा मित्र राहुल यादव यासोबत अन्य दोन जण असे चार मित्र दोन बाईक घेऊन मंगळवारी सकाळी खोपोली येथील इमॅजिका येथे फिरण्यासाठी निघाले होते. यामध्ये राहुल यादव हा बुलेट बाईक घेऊन मित्र गौरवला पाठीमागे बसून निघाला होता. दरम्यान, नेरळ-जिते या वळणावर हे दोघे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आले असता विरुद्ध दिशेने म्हणजेच कर्जतहुन नेरळच्या दिशेने येत असलेला छोटा मालवाहू टेम्पो हा अचानक डिव्हायडर क्रॉस करून कर्जत खोपोलीकडे निघालेल्या बुलेट बाईकला ठोकला. या अपघातात टेम्पो पलटी होऊन बुलेटच्या मागे बसणार्‍या गौरव लाड याच्या अंगावर पडला तर बाईक चालवणारा राहुल हा जखमी झाला.


दरम्यान, त्यांचे आणखी साथीदार मागे असल्याने त्यांच्या समोरच ही घटना घडली. यावेळी साथीदार मित्रानी काही ग्रामस्थांच्या मदतीने टेम्पो उचलला असता गौरवचा जागीच मृत्यू झाला होता. मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांच्या साथीदाराला दुःख अनावर झाले होते. तर राहुलचे मांडीचे हाड मोडल्याचे समोर डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यास अधिक उपचारासाठी भिवपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी नेरळ पोलिसांनी धाव घेत टेम्पो चालकास ताब्यात घेतले.


या अपघातात मालवाहू टेम्पो चालकांची चुक असल्याचे समोर आले असून त्याने टेम्पोमध्ये प्लॅस्टिकचे पाण्याचे पिंप क्षमतेपेक्षा जास्त भरल्याचे दिसून आले. परिणामी, वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो थेट बाईकस्वाराला जावून ठोकला. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version