| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. व्हिजन रेसिडेन्सीसमोर एका दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने त्याचा जीव बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत.
एक तरुण दुचाकीवरून साईमंदिराकडून रेल्वेगेटच्या दिशेने जात असताना, व्हिजन रेसिडेन्सीसमोर खड्डे चुकवताना नाल्यात पडला. स्थानिक नागरिकांनी त्याला नाल्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातस्थळी रस्त्यालगत ना साईडपट्टी आहे, ना नाल्याला सुरक्षा भिंत. त्यात रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना सतत अपघाताचा धोका निर्माण होत आहे. नेरळ पाडा रेल्वेगेट पासून डॉ. देशमुख हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला आहे. तसेच, नेरळ विद्याभवन ते कोदिवळे गावदरम्यानही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सतत वाढणारे अपघात, रस्त्यांची दयनीय अवस्था, संरक्षक कठड्यांचा अभाव या साऱ्या गोष्टींची गंभीरता लक्षात घेता प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.







