भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

| शिहू | प्रतिनिधी |

नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या मटेरियल गेटसमोरील रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मच्छिंद्र भिकाजी घासे (39, रा. मुंढाणी, तरशेत, ता. पेण) असे मृत कामगाराचे नाव आहे. या भीषण अपघातामुळे मुंढाणी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मच्छिंद्र घासे हे आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून रिलायन्स कंपनीच्या मटेरियल गेटकडे कामावर जात होते. यावेळी मार्केटिंग बिल्डिंगसमोर मागून भरधाव वेगाने आलेल्या रेनो क्विड कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मच्छिंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. मच्छिंद्र यांच्या पश्चात गर्भवती पत्नी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी जनार्दन नारायण घासे (रा. मुंढाणी, ता. पेण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक अमित राजकुमार सिंग (सध्या रा. गांधी चौक, नागोठणे) याच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version