रस्त्यावरील चिखलाने दुचाकीस्वारांची आंघोळ

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना ‌‘मड बाथ’ची सोय

| पाली | वार्ताहर |

हरणेरी येथे बेसुमार उत्खननामुळे मातीचे डोंगर उभे राहिले असून, या मातीच्या डोंगराचा काही भाग पावसाच्या पाण्याच्या रेट्याने जांभुळपाडा-कळंब रस्त्यावर येऊन आडवा पसरला. केवळ रस्त्यावर आडवा न होता तो लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतातदेखील शिरला आहे. या मातीच्या भरावाने लगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

रस्त्यावर चिखल पसरल्याने संजय कदम हा युवक दुचाकीवरून कोसळून त्याला मुका मार लागला. दूध वाहतूक करणारे शेतकरीही या चिखलात आडवे झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमच्या प्रतिनिधीने या उत्खनाबाबत व होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून कल्पना दिली होती. परंतु, महसूल विभागाने कोणतेही पाऊल न उचलल्याने ही दुर्घटना घडली आहे. सुरवातीच्या पावसात ही परिस्थिती आहे, तर मुसळधार पावसात आमचं काय होईल? असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत.

मातीच्या मलब्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास किंवा जीव गेल्यास जबाबदार कोण? तक्रार करूनही दुर्लक्ष करणारे अधिकारी की थंड बसलेली ग्रामपंचायत? सदर जमीन ही अमित कुमार पांडेय या गृहस्थाच्या नावावर आहे. आपला नातेवाईक आयएस अधिकारी असल्याची बतावणी करून जमीन मालक स्थानिकांवर तसेच प्रशासनावर दबाव आणत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. सामान्य नागरिकांवर डोळे वटारणाऱ्या प्रशासनाचे, नातेवाईक आयएस असणाऱ्या जमीन मालकावर कारवाई करताना, हात का थरथरतात याचं उत्तर शासकीय अधिकारी देणार का? जमीन मालक, महसूल विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे अपघातग्रस्तांचा झालेला वैद्यकीय खर्च व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार? महसूल विभाग की जमीन मालक? या घटनेने शेतकरी संतप्त असून, आंदोलनाच्या तयारीत आहेत.

जमीन मालकाने जेसीबी आणून रस्ता साफ केल्यानंतर तलाठी घटनास्थळी पोहोचल्याचे समजते. तसेच या घटनेचा पंचनामा करणे अपेक्षित असताना केवळ थातुरमातुर अहवाल तयार केल्याने तलाठी तसेच नायब तहसीलदारांचे जमीनमालकासोबत हितसंबंध तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. शिवाय तलाठी, सजाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी का रहात नाही याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होत नसल्याने तहसीलदार आपल्या कर्मचाऱ्यांवर व धनदांडग्या जमीन मालकांवर इतके मेहेरबान का? याचीदेखील चौकशी व्हावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Exit mobile version