झाडांवर खिळे मारुन जाहिरात फलकबाजी

| नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील झाडांवर खिळे मारून इजा पोहोचवत जाहिरात फलक मनमानीपणे लावले जात आहेत, परंतु यासंदर्भात पालिकेचा परवाना विभाग अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

त्यासाठी झाडांना वाचवण्यासाठी नागरिकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. झाडांना मोठे खिळे मारून जाहिरात फलक लावणार्‍यावर कारवाईचा बडगा उचलण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे. दरवर्षी वन विभागासह विविध संस्थांकडून पावसाळ्यात लाखो झाडांची लागवड केली जाते, परंतु त्याचे जतन व संवर्धन न केल्याने वृक्षप्रेमींतून नेहमीच नाराजी दिसून येते. त्यात झाडांवर जाहिरात फलक लावणार्‍यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्षच होत आहे. त्यातच प्रत्येक झाडावर विविध जाहिराती असलेले फलक लावले जात आहेत. शहरातील वृक्षांच्या देखरेखीकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे झाडांवर जाहिराती लावणे, खिळे मारणे असे प्रकार सुरूच आहेत.

पनवेल शहरातील विविध भागांत झाडांना खिळे मारून जाहिरातींचे फलक उभारले आहेत. या जाहिरातदारांकडून पालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. तरीही महापालिका याकडे दुर्लक्षच करताना दिसत आहे. झाडांना खिळे ठोकल्याने झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. सोबत झाडांना बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता असते. झाड हळूहळू पोकळ होते. फळाच्या आकारमानावर परिणाम होतो. कालांतराने फळधारणा नष्ट होऊन झाडांचे आयुष्य कमी होते. वास्तविक पाहता राखीव किंवा संरक्षित वन कायद्यात झाडाचे पान जरी तोडले तरी गुन्हा आहे; मात्र शहरी भागातील झाडांबाबत कोणताही कायदा नसला तरी त्यांना इजा करणे म्हणजे तो गुन्हाच मानावा लागेल. झाडांवर खिळे ठोकल्याने, तार गुंडाळल्याने झाडाची वाढ खुंटते. यावर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.
कोट

पनवेल पालिका क्षेत्रातील झाडावर खिळे ठोकून जाहिरातबाजी करण्याचे प्रकार झाले असतील, तर पाहणी करून खिळे ठोकणार्‍या व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – संदीप पवार, वृक्ष प्राधिकरण प्रमुख, पनवेल महापालिका

Exit mobile version