बोरीपाखाडी येथे बायोचारनिर्मिती प्रशिक्षण

| चिरनेर | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी, या उद्देशाने उरण बोरीपाखाडी या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी मंगळवारी (दि. 20) बायोचारनिर्मिती आणि वापराबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना टाकाऊ कचऱ्यापासून उपयुक्त खत कसे तयार करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी आर. टी. नारनवर, मंडळ कृषी अधिकारी एस. डी. गटकळ, उपकृषी अधिकारी ए.डी. बुरकुल, नैसर्गिक शेती मिशनचे उपाध्यक्ष हेमंत पाटील, सचिव रवींद्र काठे, प्रगतशील शेतकरी कमळाकर थळी, सहाय्यक कृषी अधिकारी ए. आर. राठोड, आर. पी. भजनावले, ए. एस. पानसरे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बायोचार म्हणजे काय, याची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये पीक कापणीनंतर उरलेला कचरा न जाळता, त्यापासून शास्त्रीय पद्धतीने बायोचार तयार केल्यास जमिनीला कर्ब मिळतो आणि पाण्याची धारण क्षमता वाढत असल्याचे सांगण्यात आले. तालुका कृषी अधिकारी आर टी नारनवर यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणाला नागाव, केगाव व चांणजे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version