राज्य जैवविविधता मंडळाचे दुर्लक्ष; पर्यावरणवादी संतप्त
। चिरनेर । प्रतिनिधी ।
बीएनएचएसने उरण, पनवेल परिसरातील पाणथळ जागांमधील जैवविविधता आणि लाखोंच्या संख्येने वास्तव्यासाठी येणार्या स्थलांतरित पक्षांच्या संरक्षणासाठी अभ्यास करण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे शासनाकडूनच अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जैवविविधता व स्थलांतरित पक्षांचे संरक्षण तसेच त्यांची माहिती संकलित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
उरण, पनवेल परिसरातील अनेक पाणथळ जागा आहेत.उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ जागेत दरवर्षी 5 लाख तर नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात 2 लाखांहून अधिक विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी वास्तव्याला येत असतात, घरटी बांधतात, प्रजनन करतात. यामुळे लाखोंच्या संख्येने हजारो मैलाचे अंतर कापून येणार्या स्थलांतरित पक्ष्यांसह येथील विविध प्रकारच्या जैवविविधतेचे संरक्षणाची आवश्यकता आहे. त्यांचा अभ्यास करून माहितीही संकलन करण्याची जबाबदारी शासनाच्या महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची आहे. दरम्यान, बीएनएचएसने या परिसरातील प्रत्येक पाणथळ जागांमधील जैवविविधता आणि वास्तव्यासाठी येणार्या स्थलांतरित पक्षांच्या संरक्षण व माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीला शासनानेच केराची टोपली दाखविली आहे. परिणामी मागील 56 वर्षात या बाबतीत शासनाच्या संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
पाणथळी जागा संपुष्टात
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या दुर्लक्षितपणाचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. शासनलाला जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धनाचे गांभीर्यच उरले नाही. यामुळे विविध जैवविविधतेने बहरलेल्या आणि लाखो स्थलांतरित पक्ष्यांची वास्तव्य असलेल्या अशा दुर्मिळ पाणथळी जागा विकासाच्या नावाखाली व थोड्याशा आर्थिक फायद्यासाठी बडे भांडवलदार, विकासकांच्या हाती देण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या व होणार्या माती दगडाच्या भरावामुळे पाणथळी जागा नष्ट होऊ लागल्या आहेत. यामुळे उरण, पनवेल परिसरातील चिखलयुक्त जागांचे प्रमाण घटत चालले आहे. बेसुमार होणार्या कांदळवनांचीही संख्या कमी होत चालली आहे. यामुळे प्रजननासाठी सागरी, खाडी किनार्यावर येणार्या विविध प्रकारच्या माशांची संख्या देखील कमी झाली आहे.