। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
पनवेलकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या वडाळे तलावातील जैवविविधतेच सर्वेक्षण करण्याचा निर्णय काही निसर्गप्रेमींनी घेतला आहे. पुढील वर्षभर महिन्यातून दोन दिवस हे सर्वेक्षण केले जाणार आहे. पनवेल महापालिकेला पत्र पाठवून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून निसर्गाप्रेमी कार्यकर्ते सुदीप आठवले आणि ज्योती नाडकर्णी हे सर्वेक्षणाचे नेतृत्व आणि समन्वय करत आहेत. सर्वेक्षणातून मिळणारी माहिती पनवेल पालिका आणि वनविभागाला देण्यात येणार असल्याची माहिती सर्वेक्षणासाठी पुढाकार घेतलेले निसर्गप्रेमी सुदीप आठवले यांनी दिली आहे.
पेशवेकालीन वडाळे तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यानंतर तलावतील विविध प्रकारच्या जलपर्णींचा मोठ्या प्रमाणात र्हास झाला होता. यामुळे अनेक प्रकारचे प्रवासी पक्षी तलावापासून दुरावले आहेत. परिसरात लावण्यात येणारी साऊंड सिस्टीम, पाण्याचे फवारे आणि आजूबाजूच्या इतर कामांमुळे उरलेल्या पक्षी आणि प्राण्यांच्या त्रासात भर पडत आहे. तलावाच्या सभोवतालच्या वॉकिंग ट्रॅकवर वॉकर आणि जॉगर्सच्या वाढत्या संख्येमुळे पक्ष्यांच्या प्रजाती कमी झाल्या आहेत. सरोवराच्या निर्जंतुकीकरणाच्या कामांमुळे कमळ आणि इतर झाडे नष्ट झाली होती ज्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आणि मासे आणि सापदेखील होते.
बोटिंगला विरोध वडाळे तलावात बोटिंग सुरु करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. निसर्गप्रेमींचा याला विरोध आहे. त्याच प्रमाणे परिसरात फूड स्टॉल सुरु करण्यालादेखील विरोध आहे.
सर्वेक्षणात आढळून आलेल्या प्रजाती पक्षी- 36 जाती फुलपाखरे- 4 प्रकार इतर कीटक- 2 प्रकार वृक्ष- 15 प्रकार.
मान्सूनच्या आगमनानंतर वडाळे तलावात वाढलेल्या वनस्पतींमुळे मोठ्या संख्येने प्रजाती दिसून येतील असा आम्हांला विश्वास आहे. हंगाम आणि महिन्यानुसार आमच्या टीमद्वारे वेगवेगळ्या वेळी सर्वेक्षण केले जाईल.
सुदीप आठवले, अनुभूती संस्था






