तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन; जिल्हा परिषद बांधकाम विभागाची उदासीनता
| रायगड | प्रमोद जाधव |
अलिबाग तालुक्यातील किहीम येथील पक्षी अभ्यास केंद्राचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, अद्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. वर्षभरात होणारे काम निधीअभावी रखडल्याची माहिती बांधकाम विभागाकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींसह संपुर्ण अलिबागकरांचे स्वप्न अपुरेच राहिल्याचे चित्र आहे.
डॉ. सलीम अली हे पक्षी अभ्यासक होते. किहीम येथे राहत असताना त्यांनी अनेक पक्षांचा अभ्यास केला होता. त्यामुळे किहीम येथे सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र बांधण्याची संकल्पना उदयास आली. या प्रकल्पातून पर्यटन वाढीला चालना देणे, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे तसेच डिजीटल माहिती केंद्र व पक्ष्यांविशयी लिहिलेल्या पुस्तकांचे ग्रंथायल उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे डॉ. सीलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास व संषोधन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्हा परिशद व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाची उभारणी करण्याच्या हालचाली सूरू झाल्या.
त्यामुळे अलिबाग तालुक्यातील किहीम येथील बंद असलेली जिल्हा परिषदेच्या शाळेत हे केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. ही शाळा 2007 पासून बंद होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागाची परवानगी घेऊन 11 जानेवारी 2022 मध्ये या प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता. तत्कान पालकमंत्री तथा विद्यमान महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला. एका वर्षात हे प्रकल्प उभे राहण्याची अपेक्षा होती. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 55 लाख व प्रादेशिक पर्यटनातून 1 कोटी 20 लाख असा एकूण 1 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यांनतर कामाला सुरुवातही झाली. त्यावेळी बांधकामासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर उर्वरित निधीच प्राप्त झाला नाही. शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने या कामाला ब्रेक लागला आहे. पक्षी अभ्यास केंद्र होणार यामुळे अलिबागकर सुखावून गेले होते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षपणामुळे अलिबागसह रायगडकरांची घोर निराशा झाली आहे. पक्षी प्रेमींमध्येदेखील या प्रकाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
केंद्रातून पर्यटनवाढीला चालना
किहीम हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. सुंदर असा समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा असून निसर्गरम्य असे ठिकाण अशी किहीमची ओळख आहे. किहीममध्ये वर्षाला लाखो पर्यटक भेटी देतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने किहीमचे महत्व वाढत आहे. याच किहीमध्ये डॉ. सलीम अली यांचे काही काळ वास्तव्य होते. त्यांनी अनेक पक्षांवर संशीधन केले आहे. त्यामुळे सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. किहीम गावातच मध्यवर्ती ठिकाणी 30 गुंठे क्षेत्रामध्ये हे प्रकल्प होत आहे. संरक्षक भिंतीसह स्लॅबचे बांधकाम आहे. या प्रकल्पामुळे देशातील आणि विषेशतः कोकणातील वेगवेगळ्या पक्षांची माहिती स्थानिक व पर्यटकांना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन वाढीला अधिक चालना मिळणार असून हॉटेल, कॉटेजे व्यावसायिकांना पर्यटनातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
मद्यपींचा अड्डा
किहीम येथील डॉ. सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास व संषोधन केंद्र निधीअभावी रखडले आहे. या केंद्राचे भीमीपूजन तीन वर्षांपूर्वी झाले होते. परंतु, हे काम रखडल्यामुळे केंद्राभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खचदेखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासकांचे केंद्र कधी होईल तेव्हा होईल, मात्र मद्यपींचे केंद्र बनल्याचे स्थानिक नागरिक आणि पक्षी प्रेमींकडून बोलले जात आहे.
किहीम येथील पक्षी अभ्यास केंद्रासाठी 50 लाख रुपये खर्च झाले आहेत. 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम थांबले आहे. शासनाकडून निधी आल्यावर काम तातडीने सुरु केले जाईल.
– विनायक तेलंग, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद







