स्थलांतरित पक्ष्यांची संख्या रोडावली; अन्नासाठी दाही दिशा वणवण
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
लांबलेला पाऊस व बदलत्या ऋतुमानाचा फटका जिल्ह्यातील पक्षांना आणि प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांना बसला आहे. त्यामुळे पक्षांच्या जीवन चक्रावर देखील परिणाम झाला आहे. पक्ष्यांना घरटे बांधण्यास बाधा आली आहे. त्याचबरोबर पक्षांच्या अन्नाचे स्रोत कमी झाल्याने त्यांना अन्नासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. तसेच, हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात रोडावत चालली आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत.
गेल्या दोन-तीन दशकांपासून निसर्गामध्ये अपरिमित असे बदल झाल्यामुळे प्रत्येक ऋतू हा बदलत चालला आहे आणि त्यांचा कालावधी सुद्धा बदलत आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिना उजाडला तरी सुरूच आहे. शिवाय हवामानात प्रचंड दमटपणा व ओलावा आहे. या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम पक्षांच्या एकूणच आरोग्यावर पडताना दिसत आहे. खरंतर नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते किंवा थंडीसाठी पोषक वातावरण बनते. त्यामुळे उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशातील स्थानिक पक्षी उदरनिर्वाह करिता स्थलांतरित करायला सुरुवात करतात. पश्चिम भारत किंवा दक्षिण भारतात ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल होतात. असेच काही पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात.
पाऊस संपल्या नंतर ऑक्टोबर महिन्यापासून वाढलेले गवत आणि या गवतावरील कीटक म्हणजे या पक्षांसाठी खाद्याचे भांडार असते. हिवाळ्याच्या दिवसात कीटकवर्गीय जीवांना मुबलक प्रमाणात खाण्यासाठी गवत असल्या कारणाने अनेक कीटक, फुलपाखरे, सरपटणारे जीव गवताच्या आणि झाडांच्या पानांच्या सानिध्यात आपली अंडी देतात. अगदी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला या कीटकांची, फुलपाखरांची आणि सरपटणाऱ्या विविध जीवांची पिल्ले वाढलेल्या गवतावर आणि गवताच्या सानिध्यात दिसून येतात. हा कालावधी व वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक असतो. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या जीवनचक्रात अनियमित बदल घडले आहेत. जोरदार पाऊस व वादळामुळे गवत आडवे पडले असून गवत ओलसर होऊन कुजल्यामुळे सरपटणारे जीव व कीटक बऱ्याच प्रमाणात मरण पावत आहेत. याचा परिणाम पक्ष्यांवर झाला आहे.
घरट्यांना बाधा
बरेचसे पक्षी डिसेंबर व मे महिन्यात अशी साधारण दोन वेळा घरटी बांधतात. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी पक्षी आपली घरटी बांधून पूर्ण करतात. तसेच, नोव्हेंबरमध्ये काही पक्षांची घरटी बांधण्याची लगबग सुरू आहे. मात्र, परतीच्या वादळी पावसामुळे या घरट्यांना बाधा पोहोचली आहे. विशेषतः घरटी बांधणाऱ्या पक्षांची घरटी वादळी पावसामुळे खाली कोसळली. तर, काही घरटी अपूर्ण राहिली आहेत.
दख्खनकडे स्थलांतरीत
परतीचा पाऊस सतत सुरू राहिला तर अनेक पक्षी दख्खनकडे म्हणजे पुण्याकडे स्थलांतरित होतात. या स्थलांतरामध्ये देखील त्यांची परवड होते. परंतु, स्थलांतराशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो, कारण त्यांना चांगल्या निवाऱ्याची व हवामानाची आवश्यकता असते.
परतीच्या वादळी पावसामुळे स्थलांतरित पक्ष्यांची व येथील स्थानिक पक्ष्यांची देखील मोठी वाहतात झाली आहे. त्यांच्या स्थलांतराच्या चक्रावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच, पाऊस लांबल्याने पक्षांच्या आरोग्यावर हवामानाच्या बदलांचा प्रतिकूल परिणाम होतो. सततच्या पावसामुळे पक्ष्यांना निवारा शोधणे कठीण जाते. पावसात भिजल्याने अनेक पक्षी आजारी किंवा मरण पावतात, तर ढगाळ वातावरणामुळे कित्येक पक्षांची उपासमार होत असते. समुद्रकिनाऱ्यानहून अनेक आजारी पक्षी तसेच काही पक्षी नरमलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत.
-शंतनु कुवेसकर,
पक्षी व निसर्ग अभ्यासक, माणगाव
