वाहतूक कोंडीने बिरवाडीकर हैराण

| महाड । वार्ताहर ।
महाड औद्योगिक वसाहती मधील बिरवाडी गावात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन चालक, शालेय विद्यार्थी, महिला वयोवृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. बिरवाडी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.महाड औद्योगिक क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एम.आय.डी.सी.चा बहुतांश भाग हा बिरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने या गावाचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढला आहे.

शिवाय औद्योगिक परिसरातील वाळण, वरंध विभागातील नागरिकांना हि बाजारपेठ असल्याने याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मात्र योग्य नियोजन होत नसल्याने वाहतूक कोंडी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे नियोजनबद्ध आराखडा मात्र केला जात नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अरुंद रस्ते आणि दुकानांच्या समोरील वाढलेल्या शेड यांनी अधिक असलेला रस्ता वाहतुकीस अपुरा पडत आहे. मुख्य बाजारपेठ देखील अरुंद होत चालली आहे. याचा त्रास बाजारपेठेत येणार्‍या नागरिकांना होत आहे.

येथे पोलीस चौकी उभी केली असली तरी या ठिकाणी पोलीस कायमस्वरूपी नसल्याने वाहन चालकांची मनमानी वाढत चालली आहे. मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने पार्क केली जातात यामुळे अवजड वाहने एसटी बसेसना मोठा अडथळा निर्माण होतो. अशावेळी वाहतूक कोंडीला नागरिकांना कायम सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version