अर्जात चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप
| उरण | प्रतिनिधी |
नगरपरिषदेच्या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करताना भाजपच्या महिला उमेदवार कादरी शाहिस्ता मुहम्मद इब्राहिम यांनी उमेदवारी अर्जात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीच दिशाभूल करणाऱ्या माहितीची पडताळणी करून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, त्यांच्या विरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मविआच्या उमेदवार प्रार्थना चेतन म्हात्रे यांनी केली आहे.
उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी जाहीर झाली आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र.7 -अ च्या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी कादरी शाहिस्ता मुहम्मद इब्राहिम यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात मुहम्मद इब्राहिम कादरी फ्लॅट नं.001/बी.पिनकोड क्र. 400702 असा पत्ता दिलेला आहे.
हाच पत्ता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वांच्या माहितीसाठी लावलेल्या उनपच्या नोटीस बोर्डवरील प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून जाहीर केला आहे. मात्र कादरी मंझील नावाची ही जुनी इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेने राहण्यास धोकादायक असलेली इमारत याआधीच धोकादायक ठरवली आहे. त्यामुळे येथे कुणीही राहात नाही. मात्र त्यानंतरही महिला उमेदवार कादरी शाहिस्ता मुहम्मद इब्राहिम यांनी उमेदवारी अर्जात चुकीचा पत्ता दिलेला आहे. या प्रकरणी शाहिस्ता मुहम्मद इब्राहिम यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंतीही प्रार्थना म्हात्रे यांनी उरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.
प्रभाग क्रमांक -7 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे तक्रारीनंतर निवडणुकीत शाहिस्ता मुहम्मद इब्राहिम यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास उरण भाजपसाठी तो मोठा धक्का ठरणार आहे. त्यामुळे तक्रारीनंतर भीतीने भाजप गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. याबाबत उरण निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव कदम यांनी पत्ता चुकीचा दिला म्हणून अर्ज रद्द करता येत नाही. अशी माहिती त्यांनी दिली.





