भाजपने लोकशाहीचा खड्डा खणला- संजय राऊत

। मुंबई । प्रतिनिधी ।

दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपने आप व काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. दिल्ली निवडणूकीत इंडिया आघाडीतील आप व काँग्रेस या मुख्य पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्याने त्याचा मोठा फायदा भाजपला झाला व भाजप 27 वर्षानंतर दिल्लीत सत्ता स्थापन करू शकली. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी आप व काँग्रेसला फटकारत भाजपवर देखील निशाणा साधला आहे. तसेच, दिल्लीत केजरीवाल जरी हरले असले तरी देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणणारे भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा विजयी झाले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून भाजप लोकशाही पद्धतीने नाही तर शैतानी, हैवानी पद्धतीने निवडणूका लढवत आहे. आम्हाला जिंकायचेच आहे, आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे. मग त्यासाठी साम, दाम, दंड, भेद, अर्थ या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. महाराष्ट्रात जो मतदार याद्यांचा घोटाळा पाहिला तो दिल्लीत, बिहार व हरयाणात दिसला. मात्र, आता या सगळ्याचा बाऊ न करता पुढल्या लढाई साठी एकत्र येणे हा जनतेने दिलेला संदेश आहे. महाराष्ट्राच्या जनतेनंतर दिल्लीच्या जनतेने दिलेला संदेश आहे. कालच्या निकालाचे आकडे सांगत आहेत की, जर काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता. त्यामुळे आता भविष्यात एकत्र राहायचे की स्वतंत्र लढायचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे, असे राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या बारा वर्षात देशात अनेक संकटं आली. देश लुटला जात आहे. एकाच उद्योगपतीच्या घशात देशाची संपत्ती घातली जात आहे. अण्णा हजारेंनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते भाजपमध्ये गेले आहेत. अण्णांना त्याच्यावर आपले मत व्यक्त करावे असे वाटत नाही, याचे रहस्य काय आहे. केजरीवालांनी त्यांचा पराभव स्वीकारला आहे. केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसला देखील झाला असेल तर त्याचे मला दुखं वाटत आहे. केजरीवाल जरी हरले असले तरी भाजप विजयी झाला. नरेंद्र मोदी, अमित शहा विजयी झाले. या लोकांनी देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणला आहे, असे ही संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version