धैयशिल पाटलांची पुन्हा बोळवण

मोदींच्या फोल ठरलेल्या योजनांचा वाचला पाढा

| पेण | विशेष प्रतिनिधी |

योग्य ठिकाणी वर्णी लावू अशा आश्वासनावर भाजपाने पुन्हा एकदा धैर्यशिल पाटील यांची बोळवण केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असला, तरी त्याचे पालन होणार का, अशी साशंकता पाटील यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे पेण येथील सभा केवळ पाटील यांची समजूत काढण्यासाठी आणि मोदी यांच्या फोल ठरलेल्या योजनांचा पाढा वाचण्यासाठी होती का, असा प्रश्न पेणमधील जनतेला पडला आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुनील तटकरे यशस्वी झाले. त्यामुळे खासदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धैर्यशिल पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना चांगलाच धक्का बसला होता.

तटकरे यांची उमेदवारी झाल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी म्हणावे तसे काम होत असल्याचे दिसत नव्हते. पेण तालुक्यात सर्वाधिक मतदार असल्याने या ठिकाणी प्रचाराचे कामच झाले नाही, तर ते तटकरेंना परवडणारे नव्हते. त्यामुळे तटकरेंची धाकधुक चांगलीच वाढली होती. शुक्रवारी महायुतीचे उमेदावाराचा प्रचारासाठी सभा घेऊन आम्ही कामाला लागलो आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपाने केला. तटकरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी पाचारण करण्यात आले होते. फडणवीस यांनी सुमारे 22 मिनीटे केलेल्या भाषणात फक्त मोदी यांनी कोणत्या योजना आणल्या त्याचा काय फायदा झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट) यांच्या जाहिरनाम्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. स्थानिकांच्या प्रश्नावर ते फारसे काही बोलले नाहीत, अपवाद फक्त बाळगंगा धरणाचा होता.

फडणवीस यांना देखील धैर्यशिल पाटील यांची आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी माहिती होती. त्यांनी भाषण संपताना शेवटच्या फक्त 22 सेकंदात धैर्यशिल पाटील आणि आमदार रविंद्र पाटील यांची वर्णी लावू असे मोगमपणे सांगितल्याचे दिसून आले. योग्य ठिकाणी वर्णी म्हणजे काय, याबाबत धैर्यशिल यांच्या समर्थकांमध्ये अद्यापही संभ्रम असण्याची शक्यता नाकरता येणार नाही.

Exit mobile version